शाळेची घंटा वाजली कि सुसाट घराकडे धाव ठोकणे.आल्या आल्या दप्तर फेकून देऊन गोठ्यात जाऊन गाईंना चारा पाणी करणे..तसंच घाई घाईत भांडी घासून घेऊन पप्पा शेतात निघाले कि त्यांच्या मागे लागून शेतात जाणे..कारण फक्त एवढंच कि ऊस तोडण्यासाठी टोळी बसली होती आणि तिथे ते शेताच्या बांधाच्या बाजूला टोळीवाल्यानी टाकलेले पाल..त्यांची बिनधास्त इकडे तिकडे फिरणारी मुले त्यांना ना शाळा ना कोणाची भीती ना कोणाचं बंधन..

शेतात पोहोचलं कि संध्याकाळच्या वेळेला मस्त थंड हवा..मावळणाऱ्या सूर्याची किरणे उसाच्या पाचटीवर आणि शेजारून वाहणाऱ्या पाण्यावर पडून सगळीकडे लाल रंगाची झालेली उधळण..शेजारच्या शेतात नुकतच पाणी दिलेलं असल्यानं हवेत वाढत जाणारा गारवा… आणि या सगळ्यात टोळीवाल्या मुलांचा किलबिलाट..

पाणी दिलेलं असल्यानं मस्त मातीचा वास..आणि याच वासात अजून एक मिसळणारा वास म्हणजे तीन दगड मांडून केलेल्या चुलीवर बाजरीची भाकरी भाजत असलेला खरपूस वास..मनसोक्त बागडून आनंद घेऊन घरी पोहचल्यावर आई च्या हातची गरम गरम पिठलं भाकरी…

गेले ते दिवस ..आज पुन्हा अनुभव घायचा म्हणलं तरी ते दिवस पुन्हा येणार नाहीत..वेगळीच मजा अन वेगळाच आनंद होता गावचा..अन शेताचा..

आता फक्त शहरात गाड्यांची वर्दळ ..प्रदूषण..फक्त तोंडओळख असलेले लोक..आणि रोजचे ठरलेले काम..आणि फ्लॅट सिस्टिम मधलं ओपन किचन असलेलं क्लोज घरं….