विश्वासाचं, प्रेमाचं वातावरण निर्माण करण्यात देश, समाज म्हणून आपण कुठे कमी पडतो आहोत?

कथुआ आणि उन्नाव इथल्या घटनांचा जितका निषेध करावा तितका कमीच आहे. सामाजिक पातळीवर या अशा मानसिकतेला विविध आयाम असले तरी, जिथं प्रेम नाही, तिथं शक्तीच्या जोरावर अशा गोष्टी करणं हे पौरुषत्वाला शोभणारं नाही. या घटनांमध्ये घडलेलं रानटीपणाचं दर्शन हे किळस आणणारं आहे. खरं तर याला रानटी म्हणणं हेही योग्य वाटत नाही. याचं कारण पशूंमध्येसुद्धा प्रेमाशिवाय मीलन होत नाही. जेव्हा स्त्री-पुरुष संबंध हे केवळ प्रेमाच्या आधारावरच जोडले जायचे अशा काळापासून मानवी समाज म्हणून आपण दूर जात असताना हे सारं घडत आहे, असं मला वाटतं.

एकूणच जगभर कुटुंबसंस्थेचं विघटन, जागतिकीकरण, त्यातून आलेलं दुभंगलेपण, त्या दुभंगलेपणातून घडणाऱ्या गोष्टी अशा अंगानेही या घटनांकडे पाहणं आवश्यक आहे. त्याची मानसशास्त्रीय कारणं आताच्या अर्थव्यवस्थेतही पाहावी लागतील. समोरच्याबद्दल एकप्रकारची बेदरकार वृत्ती हे आताच्या काळाचं लक्षण बनलं आहे. एकूणातच आपलं काही चुकतं आहे असं कुणालाच वाटत नाहीये. समाजातल्या अल्पसंख्यांना ते वाटलं तरी बहुसंख्यांपर्यंत ते पोहोचवावं कसं, हेही आव्हान आहे. अशा घटनांविषयीचा राग त्या त्या वेळेला उफाळून आला तरी पुढे चळवळीत, सामूहिक कृतीत त्याचं रूपांतर होताना दिसत नाही.

गेल्या काही दिवसांत बलात्काराच्या ज्या बातम्या माध्यमांमधून आल्या, त्यातून हिंस्र वृत्तीचा जो पगडा समाजावर बसला आहे,तो समाजावर दिसतो आहे. अशा घटना घडत आलेल्या आहेत.. समाजात घृणा, तिरस्कार आणि हिंसा या प्रवृत्ती पसरल्या आहेत, हे पुन्हा एकदा अनुभवायला आलं.ज्या देशात सध्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे, तिथे त्यांच्यासमोर असा समाज असेल तर ते पूर्ण मनुष्यजातीसाठीच चिंताजनक आहे.

गेल्या हजार वर्षांत भारतातली संतपरंपरा आणि स्वातंत्र्यासाठी झालेलं आंदोलन या दोन्हीमध्ये स्त्रीत्वाचा गौरव केला गेला. सध्या जे उद्दाम पुरुषत्व मिरवलं जातं, त्याला नाकारून पुन्हा एकदा स्त्रीत्वाचा आपला सांस्कृतिक  वारसा समाजापुढे आणण्याची वेळ आलेली आहे.

एकापाठोपाठ अत्यंत घृणास्पद घटनांनी गेले काही दिवस आपण सारेच व्यथित झालेलो आहोत. माणूस बनण्याचा आपण गेली हजारो र्वष प्रयत्न करत आहोत, तरीही आपल्यातलं पाशवीपण अजून संपलेलं नाही, हे अशा घटनांमधून जाणवत राहतं.

ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, ते कोणत्या धर्माचे आहेत याच्यावरून जर अन्यायाची तीव्रता आपण ठरवत असू तर यापेक्षा चमत्कारिक दुसरं काहीही नाही. एक प्रकारचा निर्लज्जपणा आपल्यात आला आहे- माणूस म्हणून, समाज म्हणून, या विश्वाचे नागरिक म्हणून.. आपण कल्पनाही करू शकत नाही की, एखाद्या लहान मुलीवर बलात्कार झाला आहे आणि वकील व इतर लोक असं घृणास्पद कृत्य करणाऱ्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढत आहेत. मात्र हे घडलं आहे. अशावेळी, अत्यंत अमानुष पद्धतीने वागणाऱ्या या नराधमांना माणसुकीचा न्याय     तरी का लावावा, असं वाटतं.

काळ जसा पुढे सरकत आहे तसे मानवी समाज म्हणून आपण अधिक प्रगल्भ होत आहोत, असा एक समज आहे; त्या समजालाच धक्का पोहोचवणारं वास्तव आपल्याच देशात समोर आहे. खरं तर स्थानिक आणि जागतिक असं काही सुटं राहिलेलं नाही. मानवी प्रजाती म्हणून आपण एका ऱ्हासकाळात वावरत आहोत. जगभरात एकाच काळात एकाधिकारशाही, हुकूमशाहीकडे झुकणाऱ्या राजवटी सत्तास्थानी येताना आपण पाहत आहोत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष होणं असो, वा रशियात कावेबाज पुतिन पुन्हा सत्तेत येणं असो, एकाच माणसाच्या हाती आर्थिक-राजकीय सत्ता एकवटणं हे सारं जग अनुभवत आहे. भारतही यास अपवाद नाही. नजीकच्या भूतकाळात तरी मानवी समाजाने हे एकाच वेळी अनुभवलेलं नाही.

‘मी, माझा आणि मला’ एवढाच विचार दृढ होताना दिसत आहे. याच्याआधी मूल्यांविषयीचा आदर, मूल्यांचा धाक मानवी समाजामध्ये होता. परंतु आजच्या एकंदर स्वार्थभावापुढे ती मूल्यव्यवस्थाच नाहीशी होते की काय, असा प्रश्न पडतो. हे असं घडणं मानवी प्रजातीच्या ऱ्हासकाळाचं चिन्हं वाटतं. कुठल्याही प्रजातीचा जन्म, विकास आणि ऱ्हास हे चक्र सुरू राहणारच; पण आपल्या कृतीने हा ऱ्हास आपण अधिक जवळ आणतो आहोत, असं वाटतं.

निव्वळ आपल्या देशाचा विचार जरी केला तरी, आपल्याकडच्या मध्यमवर्गामध्ये एक संवेदन नेहमी जागं असायचं. आर्थिक, जातीय अशा सर्वच अर्थानी आपल्यापेक्षा खालच्या स्तराबद्दल या वर्गाला कणव, आस्था होती. नव्वदीनंतर मात्र मुक्त अर्थकारणाने सारंच चित्र बदललं. या बदलात, आपल्याकडे असलेल्या जबाबदारीचं भानच मध्यमवर्ग विसरून गेला आहे.

दिसेल त्याच्यावर झडप मारायची आणि ओरबाडून घ्यायचं, अशी वृत्ती सर्वत्र दिसते आहे. या साऱ्यांत मध्यमवर्गाकडे असलेला विवेकच त्याच्यापासून दुरावला आहे. अनेक जाती, धर्म, वंश, भाषा आणि सहअस्तित्व हा आपल्या जगण्याचा भाग होता. तशी सहिष्णुता इथं होती. तिलाच मी ‘भारतीयता’ असं म्हणेल. भारतीय समाजाचं ते फार मोठं मूल्य आहे; किंबहुना भारताने जगाला दिलेली ती देणगीच ठरावी. परंतु आज तेच मूल्य आपल्याकडेच पायदळी तुडवलं जाताना दिसतंय. मात्र मध्यमवर्गाचं संवेदन जागं झालं तर हे असं विस्कटणं आपण थांबवू शकू, पुढच्या पिढय़ांसाठी ते आवश्यक आहे.

आपली मानसिकताच आहे एखादी घटना घडून गेली की काही दिवसांनी सगळं विसरल्या जात..पुन्हा एक नवी घटना..पुन्हा एकदा candle march..पुन्हा एका केस च्या निकालाची वाट…